जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील सागर पार्कजवळील बॅरिस्टर चौकात एका अज्ञात वाहनाने सायकलस्वार वृद्धाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ६६ वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रघुनाथ बाबुराव नेवे (वय ६६, रा. जोशी कॉलनी, जळगाव) हे आपल्या दैनंदिन कामासाठी सायकलने जात होते. सायंकाळच्या सुमारास ते काव्यरत्नावली चौकाकडून आकाशवाणी चौकाच्या दिशेने जात असताना, बॅरिस्टर चौकात पाठीमागून आलेल्या एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या सायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की, नेवे हे सायकलवरून रस्त्यावर फेकले गेले आणि जागीच बेशुद्ध पडले.
अपघात घडल्यानंतर संबंधित वाहनचालकाने जखमीला मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढला. परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमी नेवे यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या डोक्याला आणि शरीराच्या अन्य भागाला गंभीर इजा झाली आहे.
या घटनेबाबत रमानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक उषा सोनवणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून फरार चालकाचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे आणि बेदरकार चालकांमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.



