जळगाव प्रतिनिधी | जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास धावणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल बसेसमधून होणारी अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलिसांनी कंबर कसली आहे. जळगाव पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री आणि पहाटेच्या सुमारास जिल्ह्यातील प्रमुख चौफुल्यांवर अचानक ‘चेकिंग मोहीम’ राबवण्यात आली. या मोहिमेमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अनेक दिवसांपासून रात्री आणि पहाटेच्या वेळी येणाऱ्या-जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल बसेसचा वापर गुटखा, गांजा, गांजा, गावठी कट्टे (देसी कट्टा), चोरीचे सामान आणि हवालाच्या पैशांची ने-आण करण्यासाठी केला जात असल्याचे निदर्शनास आले होते. धक्कादायक बाब म्हणजे, काही खाजगी बसेसचे कंडक्टर अशा बेकायदेशीर मालासाठी ‘कुरिअर’ म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली होती. या वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलिसांनी ही धडक मोहीम हाती घेतली आहे.
या कारवाईसाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली असून, त्यांना आरसीपी दलाची देखील साथ देण्यात आली आहे. शहरातील आकाशवाणी चौफुली, मुक्ताईनगर-बोदवड चौफुली आणि भुसावळ यांसारख्या मोक्याच्या ठिकाणी नाकाबंदी करून प्रत्येक बसची तपासणी केली जात आहे. पोलीस पथकांकडून केवळ बसच्या डिक्कीचीच नव्हे, तर प्रवाशांच्या संशयास्पद बॅगांचीही कसून तपासणी केली जात आहे.
जळगाव पोलिसांनी अचानक घेतलेल्या या पवित्र्यामुळे गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि अवैध धंद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी यापुढेही अशा प्रकारची कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या मोहिमेमुळे रात्रीच्या वेळी होणाऱ्या संशयास्पद हालचालींवर आता पोलिसांचा तिसरा डोळा असणार आहे.



