जळगाव प्रतिनिधी | नशिराबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोवंश सदृश्य मांसाची अवैध विक्री करणाऱ्या एका इसमावर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ३० किलो मांस, एक मोटार सायकल आणि लोखंडी कोयता असा एकूण ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक केली आहे. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नशिराबाद गावातील मणियार मोहल्ला परिसरात एक इसम गोवंश सदृश्य मांसाची विक्री करत आहे. माहितीची पडताळणी केल्यानंतर पोलीस पथकाने तातडीने मणियार मोहल्ला परिसरात अचानक छापा टाकला. या छाप्यात आरोपी मुस्ताक शेख मुसा कुरेशी (वय ४६, रा. रहेमतपुरा, नशिराबाद) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपीकडून ६ हजार रुपये किमतीचे ३० किलो गोवंश सदृश्य मांस, गुन्ह्यात वापरलेली ३०,००० रुपये किमतीची हिरो कंपनीची पॅशन मोटार सायकल (क्र. MH-19-BC-7095) आणि एक लोखंडी कोयता असा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सागर बिडे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून, नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि भुसावळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली नशिराबाद पोलीस स्टेशनच्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत विरणारे करत आहेत.



