जळगाव प्रतिनिधी | पुणे शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या नांदेड सिटी परिसरात आपल्या सुनेचा निर्घृण खून करून फरार झालेल्या सासर्याला अटक करण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) मोठे यश आले आहे. भानुदास भास्कर चौधरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, एलसीबीच्या पथकाने मेहरूण परिसरातील महादेव मंदिराजवळ सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील नांदेड सिटी परिसरात राहणारा आरोपी भानुदास चौधरी याचे त्याची सून स्वाती तेजस चौधरी हिच्यासोबत घरगुती कारणावरून वारंवार वाद होत होते. या वादाचे पर्यवसान २ मे रोजी भीषण घटनेत झाले. रागाच्या भरात भानुदासने स्वाती यांच्या डोक्यात गंभीर वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, गुन्हा केल्यानंतर कोणाला संशय येऊ नये म्हणून आरोपीने घराला बाहेरून कुलूप लावले आणि तो तिथून पसार झाला होता. याप्रकरणी पुणे पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पुणे पोलीस मागील आठ दिवसांपासून आरोपीचा शोध घेत होते, मात्र तो वारंवार आपली ठिकाणे बदलत होता. दरम्यान, आरोपी भानुदास चौधरी हा जळगाव शहरातील मेहरूण परिसरात लपून बसल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पथकाने तात्काळ हालचाली करत मेहरूणमधील महादेव मंदिर परिसरात सापळा रचला.
पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकाने त्याला अत्यंत शिताफीने बेड्या ठोकल्या. प्राथमिक चौकशीनंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. जळगाव पोलिसांनी या अटकेची माहिती पुणे पोलिसांना दिली असून, पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.



