जळगाव प्रतिनिधी । महावितरणच्या अत्यंत बेजबाबदार आणि भोंगळ कारभारामुळे जळगाव येथील उमाळा एमआयडीसीमधील (MIDC) सुमारे २५ ते ३० कंपन्या आज बंद होण्याच्या उंबरठ्यावर उभ्या ठाकल्या आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही वीज समस्या सोडवली जात नसल्याने संतप्त झालेल्या उद्योजकांनी आज अखेर जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन आपल्या तीव्र व्यथा मांडल्या. या गंभीर समस्येची दखल घेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची कडक शब्दांत कानउघाडणी करत त्यांना चांगलेच धारेवर धरले.
उमाळा एमआयडीसीत गेल्या अनेक दिवसांपासून विजेचा मोठा लपंडाव सुरू असून, यामुळे उद्योगांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. येथील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने हाय व्होल्टेजचा ट्रान्सफॉर्मर बसविण्याची सूचना मंत्री महोदयांनी यापूर्वीच महावितरणला दिली होती. मात्र, अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे आणि दिरंगाईमुळे हे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. यामुळे संतप्त झालेल्या पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्याला फोनवर खडेबोल सुनावले. “तुम्ही जळगावचे उद्योगधंदे पळवण्याचे बेणे घेतले आहे का?” असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी केला.
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, “नाशिकच्या एसी केबिनमध्ये बसून आम्हाला आदेश सांगू नका. जळगावच्या ४५ अंश सेल्सिअस तापमानात बाहेर या आणि प्रत्यक्ष परिस्थिती पहा.” एमआयडीसीतील उद्योग बंद पडल्यास शेकडो कामगारांवर उपासमारीची वेळ येईल, अशी भीती उद्योजकांनी व्यक्त केली आहे. यावर मंत्र्यांनी महावितरणला तातडीने उपाययोजना करण्याचे आणि वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे कडक आदेश दिले आहेत, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. अधिकारी आता काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



