जळगाव प्रतिनिधी । ऑनलाईन औषध विक्रीच्या वाढत्या प्रभावामुळे आणि मोठ्या ई-फार्मसी कंपन्यांच्या स्पर्धात्मक धोरणांमुळे पारंपरिक मेडिकल व्यवसाय अडचणीत सापडल्याचा आरोप करत जळगावातील औषध विक्रेत्यांनी बुधवारी तीव्र आंदोलन छेडले. देशभर पुकारण्यात आलेल्या एकदिवसीय बंदला प्रतिसाद देत जळगाव जिल्ह्यातील मेडिकल दुकानदारांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.
जळगाव जिल्हा मेडिसिन डीलर्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली शहरात निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले. खान्देश सेंट्रल मॉल परिसरातून सुरू झालेल्या या रॅलीत औषध विक्रेत्यांनी ऑनलाईन कंपन्यांच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शहरातील विविध प्रमुख मार्गांवरून रॅली काढत आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.
यानंतर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करून ऑनलाईन औषध विक्रीवर कठोर नियम लागू करण्याची मागणी केली. ई-फार्मसीमुळे स्थानिक मेडिकल व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच ऑनलाईन माध्यमातून बनावट किंवा निकृष्ट औषधे विकली जाण्याची शक्यता वाढत असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली.
सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास भविष्यात राज्यव्यापी आणि अधिक तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही औषध विक्रेत्यांनी दिला. दरम्यान, बंदमुळे अनेक भागांत नागरिकांना औषधे मिळवण्यासाठी काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला.



