जळगाव प्रतिनिधी | जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी) येथील रुग्णसेवा अधिक प्रभावी, शिस्तबद्ध आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी व्यवस्थापनाकडून नियमित आढावा घेतला जात आहे. उपस्थिती, कामातील सातत्य, शिस्त आणि कार्यक्षमता या निकषांच्या आधारे संस्थेच्या हितासाठी आवश्यक प्रशासकीय निर्णय घेतले जात असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
अलीकडे काही माध्यमांमध्ये कंपनीविरोधात प्रसिद्ध झालेल्या बातम्या वस्तुस्थितीशी विसंगत असून, त्यातील आरोप तथ्यहीन असल्याचा खुलासा व्यवस्थापनाने केला आहे. कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय करण्याचा किंवा दबाव टाकण्याचा कंपनीचा हेतू नाही. नियमित अनुपस्थिती, कामातील निष्काळजीपणा आणि कामकाजात अडथळे निर्माण करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांवरच प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे नाराज झालेल्या काही व्यक्तींनी वैयक्तिक आकसापोटी चुकीची माहिती पसरवल्याचे पडताळणीत समोर आले आहे.
दुसरीकडे, जीएमसीमध्ये कार्यरत असलेल्या विद्यमान कर्मचाऱ्यांनी सध्याच्या व्यवस्थेबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. पूर्वीच्या व्यवस्थापनाच्या काळात वेतन मिळण्यास विलंब होत असे आणि मूलभूत सुविधांचा अभाव होता. मात्र, सध्याच्या कंपनीने कामगार कल्याणाला प्राधान्य देत वेळेवर वेतन देण्याची व्यवस्था केली आहे. ही व्यवस्था पूर्वीपेक्षा अधिक पारदर्शक आणि कर्मचारीहिताची असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
कंपनी व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे की, कर्मचारी आणि रुग्ण या दोघांच्याही हिताचा समतोल राखत कामकाज केले जात आहे. कोणत्याही तक्रारीची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी कंपनी सदैव तयार आहे. “रुग्णसेवा हीच आमची सर्वोच्च जबाबदारी असून शिस्त, पारदर्शकता आणि गुणवत्तापूर्ण सेवा या तत्त्वांवर आधारित कामकाज पुढेही सुरू राहील,” असा विश्वास जीएमसी जळगाव सेवा प्रकल्पाच्या वरिष्ठ व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.



