जळगाव प्रतिनिधी | ‘जागतिक योग दिना’चे औचित्य साधून महाराष्ट्र योग शिक्षक संघटना (जळगाव जिल्हा) अंतर्गत यावर्षी २१ जून हा केवळ एकच दिवस ‘योग दिन’ म्हणून साजरा न करता, तब्बल सात दिवस ‘योग सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचा अनोखा आणि स्तुत्य निर्णय घेण्यात आला आहे. येत्या १५ जून ते २१ जून २०२६ या कालावधीत हा योग सप्ताह जळगावात मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, यादरम्यान विविध स्पर्धात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे, अशी माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
महाराष्ट्र योग शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष चित्रा महाजन, विभाग प्रमुख सुनील गुरव, राज्य कार्यकारी अध्यक्ष कृणाल महाजन आणि सचिव नूतन जोशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे या सप्ताहाचे सविस्तर नियोजन जाहीर केले आहे. योग संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार तळागाळातील लोकांपर्यंत व्हावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
असे असेल योग सप्ताहाचे वेळापत्रक:
१५ जून: ऑनलाईन रिल्स् स्पर्धा (योग सप्ताहाची सुरुवात)
१६ जून: सूत्र पठण स्पर्धा
१७ जून: योगासन स्पर्धा
१८ जून: योगगीत स्पर्धा
१९ व २० जून: योग प्रोटोकॉल कार्यक्रम
२१ जून: योग नृत्य स्पर्धा आणि योग चित्रकला स्पर्धा
२१ जून रोजी भव्य बक्षीस वितरण:
या सात दिवसीय योग सप्ताहात आयोजित प्रत्येक स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विजयी स्पर्धकांना आकर्षक पारितोषिक दिले जाणार आहे. पारितोषिक म्हणून रोख रक्कम आणि प्रमाणपत्र देऊन खेळाडूंचा गौरव करण्यात येईल. हा दिमाखदार बक्षीस वितरण सोहळा २१ जून २०२६ रोजी ‘जागतिक योग दिना’च्या मुख्य कार्यक्रमात पार पडणार आहे. जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी आणि योगप्रेमींनी या सप्ताहात आणि स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष चित्रा महाजन व संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.



