पाचोरा प्रतिनिधी | श्रद्धेय तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त निर्मल फाउंडेशनच्या वतीने शिवतीर्थ मैदानावर ज्येष्ठ पत्रकार व आंतरराष्ट्रीय व्याख्याते श्री. पुष्पेंद्रजी कुलश्रेष्ठ यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी “राष्ट्र ही सीमा नव्हे, तर संस्कृतीची अखंड चेतना” या विषयावर त्यांनी अभ्यासपूर्ण भाष्य केले. या व्याख्यानाला पाचोरा नगरीसह पंचक्रोशीतील नागरिकांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरुवात तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली आणि दीपप्रज्वलनाने झाली. व्यासपीठावर परमपूज्य विष्णुदास महाराज आणि हभप जळकेकर महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी निर्मल फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई सूर्यवंशी यांनी तात्यासाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला.
“तात्यासाहेबांनी ३५ वर्षांपूर्वीच रासायनिक खतांचा धोका ओळखून जैविक शेतीचा दूरदर्शी विचार मांडला होता. आज तीच काळाची गरज बनली आहे,” असे त्यांनी सांगितले.
”देश आणि राष्ट्र या दोन्ही संकल्पना पूर्णपणे वेगळ्या आहेत. देशाला सीमा आणि संविधान असते, ज्यात बदल होऊ शकतो; मात्र राष्ट्र ही संस्कृती, परंपरा आणि सनातन मूल्यांनी घडलेली एक अखंड चेतना आहे, त्याला सीमा नसतात.”
— पुष्पेंद्रजी कुलश्रेष्ठ
पुढे बोलताना कुलश्रेष्ठ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. स्वाभिमान, संस्कृतीरक्षण आणि राष्ट्रनिष्ठेच्या जोरावरच युवा पिढीने देशाचे भविष्य घडवावे, असे आवाहन त्यांनी केले. भारतीय संस्कृती ही केवळ परंपरा नसून जगाला दिशा देणारी जीवनपद्धती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या ओजस्वी भाषणामुळे संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला होता.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन हभप डॉ. योगिता चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन मधुभाऊ काटे यांनी मानले.



