पाचोरा प्रतिनिधी | अक्कलकोट येथून निघालेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र परिक्रमा पालखीचे ९ जून रोजी सायंकाळी ५ वाजता पाचोरा शहरात आगमन झाले. जळगाव चौफुली येथे या पालखीचे अत्यंत उत्साही आणि भक्तिमय वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले. स्वामींच्या दर्शनासाठी अबालवृद्धांसह महिला, पुरुष, तरुण आणि तरुणींची मोठी गर्दी जमली होती.
पालखीच्या स्वागतासाठी शहरात विशेष तयारी करण्यात आली होती. पालखी मार्गावर दुतर्फा नयनरम्य रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. पालखीचे आगमन होताच महिला व तरुणींनी पारंपरिक फुगड्या खेळून आनंदोत्सव साजरा केला. जळगाव चौफुली येथून सुरू झालेली ही भव्य मिरवणूक भारत डेअरी स्टॉप, कृष्णापुरी, जामनेर रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे भडगाव रोडवरील ‘स्वामी लॉन्स’ येथे पोहोचली.
मिरवणुकीदरम्यान संपूर्ण पाचोरा नगरी ‘श्री स्वामी समर्थ’ जयघोषाने दुमदुमून गेली होती. चिमुकल्या बालकांनी टाळ-मृदंगाच्या गजरात आणि पारंपारिक वेशभूषेत सुंदर नृत्य सादर केले, तर तरुण भाविकांनी डी.जे.च्या तालावर ठेका धरत आनंद व्यक्त केला. ठिकठिकाणी पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात येत होती.
सायंकाळी ८ वाजता स्वामी लॉन्स येथे पालखी विसावली. या ठिकाणी हजारो भाविकांच्या उपस्थितीत स्वामी महाराजांची भावपूर्ण महाआरती करण्यात आली. महाआरती संपल्यानंतर उपस्थित सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे (भंडारा) आयोजन करण्यात आले होते. परिसरातील हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. शिस्तबद्धता, भक्ती आणि प्रचंड उत्साह यामुळे हा पालखी सोहळा पाचोरावासियांसाठी अभूतपूर्व आणि संस्मरणीय ठरला. एकूणच संपूर्ण शहरात दिवाळीसारखे मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.



