
जळगाव महापौरपदासाठी भाजप निष्ठावंतांची चर्चा
महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. 29 पैकी 17 महानगरपालिकामध्ये भाजपला यश मिळाले असून जळगाव महानगरपालिकेत भाजप आणि महायुतीला मोठा विजय मिळाला आहे. 75 नगरसेवकांपैकी 69 जागा जिंकून महायुती आघाडीवर असून त्यात 46 पैकी 46 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष आहे; त्यापाठोपाठ 22 पैकी 22 जागा जिंकून शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. महायुतीतील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला 5 पैकी अवघ्या एका जागेवर विजय प्राप्त करता आला.
पाच उबाठाचे आणि एक अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. महापौर हा महायुतीचाच होणार असला तरी सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजप महापौर पदाचा दावेदार आहे. भाजपमध्ये अनेक वरिष्ठ नगरसेवक महापौरपदाच्या शर्यतीत असले तरी आता भाजपच्या निष्ठावंतांची महापौरपदावर वर्णी लागली पाहिजे अशी मागणी जोर धरली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुद्धा निष्ठावंतची वर्णी महापौरपदासाठी लागावी असा आग्रह धरला आहे. भाजप समोर विशेषतः जळगावचे मंत्री भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्या समोर आता महापौर निवडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
तथापि गिरीश महाजन हे ज्यांच्या नावाला आपली पसंती देतील त्यातीलच महापौर होईल हेही तितकेच खरे आहे. सध्या भाजप निष्ठावंतांमधून महिलांमध्ये भाजपच्या महिला महानगर प्रमुख उज्वला बेंडाळे, स्थायी समितीच्या माजी सभापती ॲड. सुचिता हाडा, पुरुषांमध्ये भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी आणि जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक तसेच मंत्री गिरीश महाजन यांचे अत्यंत नजीकचे विश्वासू अरविंद देशमुख यांच्या नावाची महापौरपदासाठी चर्चा सुरू आहे. या नावाव्यतिरिक्त माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी महापौर जयश्री महाजन ही नावे चर्चेत आहेत.
नितीन लढ्ढा हे शिवसेना उबाठातून निवडणुकीपूर्वी भाजप प्रवेश केला आहे. परंतु जळगाव शहराविषयी तसेच महानगरपालिका प्रशासनाचा त्यांचा दांडगा अभ्यास पाहता आणि त्यांचा अनुभव लक्षात घेतले तर महापौरपदासाठी त्यांच्या नावाला पसंती मिळू शकते. मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा नितीन लढ्ढा सारख्यांची महापौरपदासाठी निवड झाली तर शहराचा गाडा नीटपणे चालू शकतो म्हणून त्यांच्या नावाला पसंती देतील असे कळते; परंतु सध्या तरी निष्ठावंतांची नावे महापौरपदासाठी आघाडीवर आहेत. येत्या आठवड्यात महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत निघेल. आरक्षण जाहीर होताच निवड प्रक्रियेला प्रारंभ होईल.
जळगाव महानगरपालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आघाडीच्या शिवसेनेतर्फे उपमहापौर तसेच स्थायी समितीचे अध्यक्षपद मागण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेचा महापौर झाला पाहिजे अशी मागणी सुद्धा शिवसेनेच्या वतीने केली जाईल परंतु भाजपला महापौर आणि शिवसेनेला उपमहापौरपद असा तोडगा होण्याची शक्यता आहे. त्यातच भाजप स्वतःकडेच महापौरपद ठेवेल यात शंका नाही. एकूणच 75 नगरसेवकांची संख्या असलेल्या जळगाव महानगरपालिकेत 69 जागा महायुतीला मिळाल्या असल्याने महानगरपालिकेत विरोधी पक्ष नावालाच शिल्लक आहे. विरोधी पक्षाचा सत्ताधाऱ्यांवर काहीच दबाव राहणार नाही.
जळगाव महानगरपालिकेत विकासाचे पर्व सुरू राहणे हे सत्ताधारी भाजप आणि महायुतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित जळगाव करण्याची केलेली घोषणा प्रत्यक्ष अंमलात आणायची असेल तर महानगरपालिकेत विकासपर्व महत्त्वाचे ठरणार आहे, त्यासाठी महापालिकेत चांगल्या पदावर चांगले कारभारी नेमण्याची आवश्यकता आहे; त्यातच मंत्री गिरीश महाजन यांनी मागील पंचवार्षिक निवडणुकीत दिलेली आश्वासन काही कारणास्तव पूर्ण होऊ शकले नाही परंतु यंदाच्या निवडणुकीत त्यांनी दिलेले विकासाचे आश्वासन पूर्ण झाले नाहीत तर जळगावकर फार मोठा अन्याय होईलच! आता जळगाव शहराच्या विकासाचा प्रश्न महाजनांसाठी ऐरणीवर आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही; त्यासाठी जळगावच्या महापौरपदासाठी चांगल्या व्यक्तीची निवड होणे महत्त्वाचे आहे, त्यासाठी महापौरांच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


