भुसावळ प्रतिनिधी | भुसावळ येथील पंचशील नगर परिसरातील बंद घरात झालेल्या घरफोडीचा भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत यशस्वी छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण २ लाख ४९ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
पंचशील नगरचे रहिवासी शुभम विनायक जामनकर (वय ३२) हे १८ मे ते ७ जून या कालावधीत बाहेरगावी गेले होते. याचाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाटातून १ लाख ४६ हजार रुपयांचे दागिने लंपास केले. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संशयावरून सैय्याद तोहीद सैय्यद मनियार (वय २१) व अरबाज शेख अजमल शेख (वय २६, दोघे रा. पंचशील नगर, भुसावळ) यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या खाकीचा इंगा दाखवताच त्यांनी जामनकर यांच्या घरातील चोरीची कबुली दिली. धक्कादायक बाब म्हणजे, चौकशीत त्यांनी आणखी एका घरफोडीची कबुली देत, साक्षीदाराच्या घरातून चोरी केलेले १ लाख ३ हजार रुपये किमतीचे ७ ग्रॅम सोन्याचे दागिनेही पोलिसांच्या हवाली केले.
ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या सूचनेनुसार हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर, कांतिलाल केदारे, योगेश माळी, प्रशांत सोनार, सचिन चौधरी यांसह पथकाने ही कामगिरी बजावली. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ कांतिलाल केदारे हे करीत आहेत.



