भडगाव प्रतिनिधी | शहरातील यशवंतनगर भागात जुन्या वादातून एका महिलेवर हमालीसाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी हुकने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दि. १२ जून २०२६ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून, या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
यशवंतनगर येथील रहिवासी कविता सुरेश पाटील आणि त्यांच्या घरासमोरच राहणारे अस्लम बिस्मिल्ला शेख व त्यांची पत्नी शमीन अस्लम शेख यांच्यात पूर्ववैमनस्य आहे. रात्री ९ वाजेच्या सुमारास या जुन्या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. संशयितांनी कविता पाटील यांना आपल्या घरात बोलावून घेतले आणि लोखंडी हुकसदृश वस्तूने त्यांच्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात कविता यांच्या गळ्यावर आणि शरीराच्या इतर भागांवर गंभीर जखमा झाल्या.
हल्ल्यानंतर कविता पाटील रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून स्थानिक नागरिक आणि पोलिस पाटलांनी त्यांना तातडीने भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी जखमी महिलेची सून राधा सागर पाटील यांनी भडगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित अस्लम शेख आणि शमीन शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी विजय ठाकूरवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



