जळगाव प्रतिनिधी | एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या आर्थिक आणि इतर न्याय्य मागण्यांकडे प्रशासन व राज्य शासनाकडून सातत्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या उदासीन धोरणाचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आज ‘सेवा शक्ती संघर्ष संघटने’च्या नेतृत्वाखाली राज्यभरात व्यापक आंदोलन छेडण्यात आले.
याचाच एक भाग म्हणून जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रमुख आगारांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी हाताला काळ्या फिती लावून कर्तव्यावर हजेरी लावली आणि प्रशासनाचा जाहीर निषेध केला.
जळगाव आगारासह जिल्ह्यातील विविध आगारांमधील चालक, वाहक, यांत्रिक विभागातील कर्मचारी आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. प्रवाशांची गैरसोय न करता, केवळ काळ्या फिती लावून कर्मचाऱ्यांनी शांततापूर्ण मार्गाने आपला रोष व्यक्त केला. आंदोलनादरम्यान कर्मचाऱ्यांनी प्रशासन आणि सरकारच्या वेळकाढू धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र नाराजी व्यक्त केली.
मागण्यांकडे सरकारचे दुर्लक्ष:
सेवा शक्ती संघर्ष संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि इतर अनेक आर्थिक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. या संदर्भात संघटनेने वारंवार वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला, अनेक निवेदने दिली. मात्र, प्रत्येक वेळी केवळ पोकळ आश्वासनांशिवाय कर्मचाऱ्यांच्या पदरात काहीही पडलेले नाही. आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी कामगारांना वारंवार उपोषणे आणि आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत आहे, ही अत्यंत खेदजनक बाब आहे.”
आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा:
सध्या संपूर्ण राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासनाच्या या भूमिकेमुळे प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य शासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन कर्मचाऱ्यांच्या सर्व आर्थिक मागण्यांवर तातडीने आणि सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शासनाने तातडीने पावले न उचलल्यास, आगामी काळात हे आंदोलन अधिक उग्र आणि तीव्र केले जाईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला.



