जळगाव प्रतिनिधी | सध्याच्या डिजिटल युगात वाढदिवसानिमित्त गल्लोगल्ली लागणारे महागडे फ्लेक्स-बॅनर्स, डीजेची कानठळ्या बसवणारी गाणी आणि पार्ट्यांवर लाखो रुपयांची उधळपट्टी करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. मात्र, या सर्व अनावश्यक दिखाव्याला आणि खर्चाला फाटा देत जळगावातील दोन तरुण उद्योजकांनी सामाजिक बांधिलकीचा एक अनोखा आणि आदर्श पायंडा समाजात घालून दिला आहे.
अयांश ऑटोचे संचालक यश सुनील मंत्री आणि युवा उद्योजक अमोल कासट यांनी आपल्या वाढदिवसाचा बडेजाव टाळत, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ‘जीपीएस मित्र परिवार’ या संस्थेला मोठी आर्थिक मदत केली आहे. यश मंत्री यांनी ७१ हजार रुपये आणि अमोल कासट यांनी १ लाख रुपये, अशी एकूण १ लाख ७१ हजार रुपयांची भरीव मदत संस्थेचे सर्वेसर्वा तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्याकडे सुपूर्द केली.
असा होणार निधीचा विनियोग:
वाढदिवसाचा अवाजवी खर्च टाळून जमा झालेल्या या निधीतून ‘जीपीएस मित्र परिवारा’च्या माध्यमातून आगामी काळात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये गरीब व अनाथ विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, शालेय साहित्य वाटप करणे आणि त्यांची शैक्षणिक फी भरणे, अनाथाश्रमातील मुलांना अन्नधान्य व कपडे देणे, वृद्धाश्रमात जाऊन ज्येष्ठांना मदत करणे, तसेच वृक्षारोपण आणि मोफत आरोग्य व रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे यांसारख्या पवित्र कार्यांचा समावेश आहे.
सर्व स्तरांतून कौतुक:
“अनावश्यक पार्ट्यांपेक्षा गरजू घटकांना मदत केल्याने मिळणारे समाधान चिरंतन असते,” अशी भावना याप्रसंगी दोन्ही उद्योजकांनी व्यक्त केली. आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करत समाजातील दुर्लक्षित घटकांना मोठा आधार दिल्याबद्दल यश मंत्री आणि अमोल कासट यांचे जळगावात सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. ‘जीपीएस मित्र परिवार’ संस्थेच्या वतीने दोन्ही युवा उद्योजकांना त्यांच्या भावी यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.



