
उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांचे नेत्यांपुढे लोटांगण!
जळगाव : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेल्या नसल्या, तरी जिल्ह्याच्या राजकारणात निवडणूक रणधुमाळीला सुरुवात झाल्याचे चित्र आहे. आरक्षणासंदर्भातील मर्यादांवर दि. 21 जानेवारी रोजी होणाऱ्या न्यायालयीन सुनावणीकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले असून, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, निवडणूक अधिसूचनेआधीच इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक मैदानात उतरल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे.
यंदाच्या निवडणुकीत उमेदवाराची कार्यक्षमता, कामाचा अनुभव किंवा जनसंपर्कापेक्षा ‘जातीय समीकरण’ अधिक निर्णायक ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळेच विविध पक्षांतील कार्यकर्ते आपापल्या जातीच्या उमेदवारासाठी लॉबिंग करताना दिसत आहेत. इच्छुक उमेदवारांच्या नावांची चर्चा ही पक्षांतर्गत बैठकींपेक्षा चहाच्या टपऱ्यांपासून ते वरिष्ठ नेत्यांच्या दालनांपर्यंत सुरू झाली आहे.
स्थानिक पातळीवर कोणत्या गटाला किती लोकसंख्येचे पाठबळ आहे, कोणत्या गट-गणात कोणत्या समाजाचे वर्चस्व आहे, याची आकडेमोड आतापासूनच केली जात आहे. या आकडेमोडीतूनच उमेदवारी मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांचे धुरंधर डावपेच उघडपणे दिसू लागले आहेत. काही ठिकाणी तर एकाच पक्षातील दोन गट परस्परविरोधी भूमिकेत उभे ठाकल्याचे चित्र आहे. सत्ताधारी भाजप व शिवसेना या पक्षांचे कार्यकर्ते या घडामोडींमध्ये विशेष सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. सत्तेत असल्याचा फायदा घेत वरिष्ठ पातळीवर पोहोचण्याचे प्रयत्न, संघटनात्मक ताकद दाखवणे, मलाच उमेदवारी यासाठी दबाव तंत्र वापरण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे जिल्हा नेतृत्व मात्र सर्व हालचालींवर बारीक लक्ष ठेवून असल्याचे सांगितले जाते. चुकीच्या निर्णयामुळे अंतर्गत नाराजी वाढू नये आणि निवडणुकीत फटका बसू नये, यासाठी भाजपाकडून सावध पावले टाकली जात आहेत.
इच्छुकांचे शक्तीप्रदर्शन!
उमेदवारी मिळवण्यासाठी काही इच्छुकांनी थेट शक्तिप्रदर्शनाचा मार्ग अवलंबल्याचेही दिसते. समर्थकांचा लवाजमा गोळा करून जिल्हा व राज्यस्तरीय नेत्यांच्या भेटी घेणे, सोशल मीडियावर स्वतःच्या समर्थनार्थ वातावरण निर्माण करणे, तसेच विविध कार्यक्रमांतून उपस्थिती ठळकपणे दाखवणे, असे प्रयत्न सुरू आहेत. तर काही इच्छुक मात्र ‘थांबा आणि पाहा’ या भूमिकेत राहून शांतपणे घडामोडींवर लक्ष ठेवत आहेत. योग्य वेळी योग्य पाऊल टाकावे, असा त्यांचा अंदाज आहे.
न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
आरक्षणाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरक्षण स्पष्ट झाल्यानंतर अनेक समीकरणे बदलू शकतात. आज जे इच्छुक आघाडीवर आहेत, ते उद्या रांगेत मागे पडू शकतात, तर सध्या शांत असलेले काही चेहरे अचानक पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच सध्याची धावपळ ही ‘पूर्वतयारी’ मानली जात आहे. निवडणूक अद्याप जाहीर न झालेली असली तरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या राजकारणात सध्या उमेदवारीसाठीचा संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे.


