जळगाव प्रतिनिधी | जळगाव विधान परिषद निवडणुकीतील एका जागेसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रियेला उत्साहात सुरुवात झाली. जिल्ह्यातील सात मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान सुरू असून संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडत आहे. या निवडणुकीत एकूण ६३० मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यामध्ये ३१५ पुरुष आणि ३१५ महिला मतदारांचा समावेश आहे.
या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांच्यात मुख्य लढत होत आहे. अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी उमेदवारी मागे घेतली असून बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे तसेच माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. जळगाव तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर प्रथमच निवडून आलेल्या अनेक तरुण नगरसेवकांनी बॅलेट पेपरवर मतदान करताना उत्साह व्यक्त केला. पहिल्यांदाच अशा पद्धतीने मतदान करण्याची संधी मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी जामनेर नगराध्यक्ष साधनाताई महाजन, जळगाव महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे, नगरसेवक अरविंद देशमुख, दीपक सूर्यवंशी, वीरेंद्र खडके यांच्यासह अनेक नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजावला. तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांनीही मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपले मतदान केले. मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असून निकालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



