जळगाव प्रतिनिधी । राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार केलेले अथवा मॉर्फ केलेले बनावट फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून त्यासोबत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावरही मोठी चर्चा सुरू झाली आहे.
जळगाव सायबर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रमांक 17/2026 नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 356 आणि 3(5) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम 66(C) आणि 67 अंतर्गत संबंधितांविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका फेसबुक खात्यावरून मंत्री गिरीश महाजन यांचे AI-निर्मित अथवा संगणकीय पद्धतीने मॉर्फ केलेले फोटो वापरून दिशाभूल करणारा आणि बदनामीकारक मजकूर प्रसारित करण्यात आला होता. या पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झाल्यानंतर याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीची प्राथमिक पडताळणी केल्यानंतर सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.
दरम्यान, संबंधित फेसबुक खाते चालविणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी सायबर पोलिसांकडून तांत्रिक तपास करण्यात येत आहे. आरोपींची ओळख पटवून त्यांच्याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. AI तंत्रज्ञानाचा गैरवापर करून व्यक्तींची बदनामी करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी सोशल मीडियावरील कोणतीही माहिती पडताळणीशिवाय शेअर करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.



