जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील मेहरूण तलाव परिसरात असलेल्या एका उच्चभ्रू वस्तीत घरकाम करणाऱ्या महिलेनेच आपल्या साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत संशयित महिला आणि तिच्या मध्य प्रदेशातील साथीदाराला बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून ४ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मेहरूण तलाव जवळील ‘लेकसाईड रेसिडेन्सी’ मध्ये राहणाऱ्या गृहिणी सौ. सुधा प्रभुनाथ कावरा (वय ५१) यांच्या घरातून तसेच त्यांच्या समोर राहणाऱ्या तेजल संचेती यांच्या घरातून सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. सौ. कावरा यांनी त्यांच्याकडे घरकाम करणाऱ्या समताबाई धर्मराज धांडेकर (वय ४१, मूळ रा. धारणी, जि. अमरावती) हिच्यावर संशय व्यक्त केला होता. या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाचे आदेश दिले. पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित महिला समताबाई हिला ताब्यात घेऊन कौशल्यपूर्ण चौकशी केली. तेव्हा तिने मध्य प्रदेशातील तिचा साथीदार धर्मराज हरिसिंग मीना (वय २८, रा. विदिशा, मध्य प्रदेश) याच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत धर्मराज मीना यालाही अटक केली. त्यांच्याकडून ३ लाख ९ हजार रुपये किंमतीचा २३.१० ग्रॅम वजनाचा सोन्याचे नेकलेस आणि ९१ हजारांचा ९.६४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले, असा एकूण ४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, विजयसिंग पाटील, गिरीश पाटील, किरण चौधरी, प्रमोद लांडवंजारी, विशाल कोळी, सुभाष साबळे आणि योगेश घुगे यांच्या पथकाने बजावली.



