जळगाव महालाईव्ह न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका हॉटेल चालकावर आणि त्यांच्या मित्रावर लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कानळदा रोडवरील राधा रमण अपार्टमेंटच्या गेटजवळ घडली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
योगेश गोपाळ साळी (वय ३८, रा. हरिओम नगर, कानळदा रोड) हे हॉटेल व्यावसायिक असून, ते १८ जून रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास राधा रमण अपार्टमेंटच्या गेटजवळ फिरत होते. दरम्यान, तेथून जाणाऱ्या एका मालवाहू गाडीतून (क्र. MH-04-HD-7529) प्रचंड घाण वास येत होता. त्यामुळे योगेश साळी यांनी “गाडीमध्ये काय आहे, इतका घाण वास का येतोय?” अशी विचारणा केली. याच साध्या गोष्टीचा तीव्र राग अनावर झाल्याने गाडीतील आरोपी समशेर खान याच्या लहान आणि मोठ्या मुलाने गाडीतून खाली उतरून साळी यांना थेट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
हा वाद एवढ्यावरच थांबला नाही, तर संशयित आरोपींनी फोन करून त्यांचे नातेवाईक आणि इतर साथीदारांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्या ठिकाणी आलेल्या समशेर खानच्या भावाने राहुल सोनवणे यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने जोरदार प्रहार केला, ज्यामुळे राहुल गंभीर जखमी होऊन कोसळले. आपल्या मित्राला वाचवण्यासाठी फिर्यादी योगेश साळी मध्ये पडले असता, आरोपी समशेर खान, त्याचा भाऊ आणि त्याच्या दोन मुलांनी मिळून साळी यांनाही बेदम मारहाण केली. समशेर खानने हातातील लाकडी दांडक्याने साळी यांच्या डोक्यावर, डाव्या हाताच्या दंडावर, मनगटावर आणि पायावर गंभीर दुखापत केली. यााबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड हे करीत आहे.



