चाळीसगाव प्रतिनिधी | शहरातील नारायण वाडी परिसरात एका तरुणाची दगडाने डोके ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचे नाव अक्षय पाटील असे असून, ही घटना मध्यरात्री १ ते १.३० वाजेच्या दरम्यान घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
प्राथमिक तपासानुसार, बसस्थानक परिसरात वाहन उभे करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून हा खून झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाद विकोपाला गेल्यानंतर अज्ञात संशयितांनी अक्षय पाटील यांच्यावर दगडाने जीवघेणा हल्ला केला. डोक्यावर गंभीर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून पंचनामा करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. घटनास्थळावरील पुरावे संकलित करण्यात येत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.
या प्रकरणातील संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली असून विविध ठिकाणी तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात येत आहेत. नेमका वाद कशामुळे झाला आणि त्यामागील कारण काय होते, याचा तपास सुरू आहे. या निर्घृण हत्येमुळे चाळीसगाव शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.



