धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव शहरातील मातोश्री नगर भागात एका सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण १ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरनी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुकर कृष्णा महाजन (वय ६६, रा. मातोश्री नगर, धरणगाव) हे आपल्या कुटुंबासह येथे राहतात. महाजन हे शिक्षण क्षेत्रातून मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. दि. १७ जून ते १८ जून दरम्यान महाजन यांचे कुटुंब काही कामानिमित्त बाहेर गेले होते. घर बंद असल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
चोरट्यांनी घरातील कपाटातून ४०,००० रुपयांची रोकड, ४४,००० रुपये किमतीची सोन्याची पोत आणि ५,००० रुपये किमतीचे चांदीचे जोडवे असा एकूण १ लाख ८९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. महाजन कुटुंब जेव्हा १९ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घरी परतले, तेव्हा त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले आणि चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला.
घरात सर्वत्र सामान अस्ताव्यस्त पडले होते आणि मौल्यवान मुद्देमाल गायब होता. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मधुकर महाजन यांनी तातडीने धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. महाजन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या चोरीच्या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र महाजन हे करत आहेत.



