जळगाव-प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कानळदा गावात जुन्या वादातून एका दांपत्याला बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना १८ जून रोजी घडली. या प्रकरणी सहा जणांविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांचन आकाश सपकाळे (वय २४, रा. कानळदा, ता. जळगाव) या आपल्या पती आकाश सपकाळे यांच्यासह गावात वास्तव्यास आहेत. यापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून गावातील मंगला धनराज सपकाळे, समाधान धनराज सपकाळे, भैय्या धनराज सपकाळे, मयूर ज्ञानेश्वर सपकाळे, दीपक बन्सी सपकाळे आणि सुरेखा मयूर सपकाळे यांनी दांपत्याला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप आहे.
यावेळी आरोपींनी हातातील काठीने आकाश सपकाळे यांच्या डोक्यावर वार केल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. कांचन सपकाळे यांनाही चापटाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर दोघांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेनंतर कांचन सपकाळे यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून संबंधित सहा जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल धनराज पाटील करीत आहेत.



