रावेर प्रतिनिधी | नव्याने रुजू झालेले पोलिस निरिक्षक संदीप पाटील यांनी भाजपा नगरसेवक दिलीप पाटील यांच्या घोफोडीतील आरोपी पडले आहे. प्रलंबित गुन्ह्याच्या आरोपींचा शोध लावुन पर्दापाश केल्याने संदीप पाटील यांच्या कार्याची कौतुक होत आहे.
शहरातील रामबाग परिसरात नगरसेवकांच्या घरी झालेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावत रावेर गुन्हे शोध पथकाने चार सराईत चोरट्यांना मध्यप्रदेशातील नारायणगड येथून अटक केली आहे. आरोपींकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याचा गुन्हा उघडकीस आला असून या कारवाईमुळे पोलिसांच्या तपास कौशल्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
२० मार्च रोजी रावेर पोलिस स्थानकात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी नगरसेवक दिलीप पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १८ मार्च रोजी ते पत्नी व मुलांसह घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या खिडकीचे गज कापून प्रवेश केला. घरातील सोन्या-चांदीचे दागिने व मौल्यवान वस्तू असा सुमारे २ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. मात्र आरोपी अत्यंत चलाख असल्याने ते कोणत्याही सीसीटीव्हीमध्ये दिसून आले नाहीत.
तपासादरम्यान आरोपींनी शहरातील नाल्यांचा वापर करून हालचाली केल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्यांनी कमी आवाज करणाऱ्या बॅटरीवर चालणाऱ्या कटर मशीनने खिडकीचे गज कापल्याचेही आढळून आले. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू ठेवला.
तपासादरम्यान मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील एक टोळी अशा प्रकारच्या घरफोड्यांमध्ये सक्रिय असल्याची माहिती मिळाली. नारायणगड पोलिसांनी याच टोळीतील काही आरोपींना दुसऱ्या चोरीच्या गुन्ह्यात अटक केल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर रावेर पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली.
यानुसार पोलिसांनी गणेशा उर्फ गणपत पिता दितिया (वय २८, रा. रंजीतगड, जि. अलीराजपूर), कैलास पिता दितिया (वय ५०, रा. रंजीतगड, जि. अलीराजपूर), छोटू पिता खेमसिंग (रा. नवली थाना टांडा, जि. धार) आणि दिनेश लक्ष्मण अनारे (वय २३, रा. भिलवटी, जि. धार) या चार आरोपींना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता ३ दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे तसेच गुन्हे शोध पथकातील इश्वर चव्हाण,समाधान ठाकरे, रोहित महाजन, श्रीकांत चव्हाण, प्रमोद पाटील, विशाल पाटील आणि सुकेश तडवी यांनी केली.



