जळगाव प्रतिनिधी | जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाली. महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांच्यात थेट लढत झाल्याने या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
मतमोजणीची प्रक्रिया तीन टेबलवर राबविण्यात येत असून बॅलेट पेपरवरील मतांची टप्प्याटप्प्याने मोजणी केली जात आहे. मतमोजणी केंद्र परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्हीच्या निगराणीखाली पार पडत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे.
महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे करण्यात आले असले, तरी प्रत्यक्ष निकालातून मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला हे काही तासांत स्पष्ट होणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण ६३० मतदार पात्र होते. त्यापैकी ६१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विजयी होण्यासाठी उमेदवाराला किमान ३१६ प्रथम पसंतीची मते आवश्यक आहेत. सुरुवातीला सर्व मतदान केंद्रांवरील मतपेट्यांमधील बॅलेट पेपर एकत्रित करून त्यानंतर ५०-५० मतांच्या गटात तीन टेबलवर मतमोजणी सुरू करण्यात आली.



