जळगाव प्रतिनिधी | जळगाव विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांचा ५७७ मतांनी पराभव केला. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर नंदकिशोर महाजन यांच्या विजयावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले. या विजयामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले असून विविध ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाई वाटप करण्यात आले.
जिल्ह्यातील एकूण ६३० मतदारांपैकी ६१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त आणि सीसीटीव्हीच्या निगराणीखाली मतमोजणी प्रक्रिया पार पडली.
मतमोजणीदरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांनी काही वैध मते अवैध ठरवण्यात आल्याचा आरोप करत मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेतला होता. त्यांनी प्रशासन आणि भाजपवर मिलीभगतीचाही आरोप केला होता. मात्र, सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नंदकिशोर महाजन यांनी तब्बल ५७७ मतांच्या फरकाने विजय मिळवत विधान परिषदेत दमदार प्रवेश केला.
या निकालामुळे जळगाव जिल्ह्यात महायुतीचे राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. निकाल जाहीर होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष करत एकमेकांना मिठाई भरवून आनंदोत्सव साजरा केला.



