अमळनेर प्रतिनिधी | जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून त्यांची बदनामी करण्यात येत असल्याचा आरोप करत संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी खासदार स्मिता वाघ यांचीही उपस्थिती होती.
भाजपने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून मंत्री गिरीश महाजन यांचे एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार केलेले मॉर्फ फोटो विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही व्यक्तींमार्फत प्रसारित केले जात आहेत. या माध्यमातून एका लोकप्रतिनिधीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असून, यामागील संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच असे मॉर्फ फोटो जाणूनबुजून लाईक, शेअर किंवा व्हायरल करणाऱ्या व्यक्तींवरही कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका भाजपने मांडली आहे. सोशल मीडियावर दिशाभूल करणारी आणि द्वेष पसरविणारी माहिती रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी अपेक्षाही निवेदनातून व्यक्त करण्यात आली.
यावेळी जानवे मंडळ अध्यक्ष जिजाबराव पाटील, पातोंडा मंडळ अध्यक्ष राहुल पाटील, शहराध्यक्ष योगेश महाजन, डॉ. अनिल शिंदे, ॲड. व्ही. आर. पाटील, गिरीश पाटील, प्रफुल पवार, हिरालाल पाटील, जितेंद्र पाटील, देवा लांडगे, विजय राजपूत, अमोल पाटील, राहुल चौधरी, भरतसिंग परदेशी, श्रीनिवास मोरे, भारती सोनवणे, माधुरी पाटील यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



