अमळनेर प्रतिनिधी | शहरातील जिनगर गल्ली परिसरात घरमालक साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल ८ लाख ६६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एकता नगरातील रहिवासी छगन चुडामन बिऱ्हाडे हे नातेवाईकांच्या साखरपुड्यानिमित्त २० जून रोजी रात्री सुरत येथे गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या नातेवाईकांनी घराचे कुलूप तुटल्याची माहिती फोनवर दिली. त्यानंतर ते तातडीने अमळनेरला परतले. घराची पाहणी केली असता दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील कपाटांचे कुलूप तोडून त्यातील सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.
चोरी झालेल्या ऐवजात सोन्याची पोत, पेंडल, चपला हार, मंगळसूत्राच्या वाट्या, कानातील दागिने तसेच लहान बाळाची सोन्याची अंगठी अशा विविध दागिन्यांचा समावेश असून त्यांची एकूण किंमत ८ लाख ६६ हजार ६८ रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
जिनगर गल्ली दाट वस्तीचा परिसर असल्याने चोरट्यांनी शेजारच्या इमारतीवरून घरात प्रवेश केला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा, श्वान पथक आणि ठसेतज्ज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. कपाटावर काही ठसे आढळून आल्याने त्यांचे नमुने तपासासाठी जप्त करण्यात आले आहेत.
याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज करीत आहेत.



