जळगाव प्रतिनिधी | ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर जळगावात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा केला. सोमवारी सायंकाळी शहरातील कालिंका माता मंदिर परिसरात सहा खासदारांच्या प्रतिमांवर दुग्धाभिषेक करून कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून संबंधित खासदारांवर विविध स्तरांतून टीका करण्यात येत होती. तसेच त्यांच्या विरोधात आंदोलन करून त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. त्याला उत्तर म्हणून दुग्धाभिषेकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत खासदारांप्रती आपला पाठिंबा व्यक्त केला. “हे खासदार आमचा अभिमान आहेत. त्यांच्यावर झालेल्या टीकेला आम्ही सकारात्मक पद्धतीने उत्तर देत आहोत,” अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
राज्यभरात या राजकीय घडामोडींची चर्चा सुरू असताना जळगावातील हा अनोखा कार्यक्रमही लक्षवेधी ठरला. मंदिर परिसरात झालेल्या या कार्यक्रमामुळे नागरिकांचेही लक्ष वेधले गेले. कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला आणि शिवसेना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.
दरम्यान, या कार्यक्रमाची शहरात दिवसभर चर्चा रंगली असून आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या कार्यक्रमांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



