चोपडा प्रतिनिधी | विद्यार्थ्यांच्या मनातील शाळेविषयीची भीती दूर करून शिक्षणाबद्दल आत्मीयता आणि आकर्षण निर्माण करण्याच्या उद्देशाने धनाजी नाना प्राथमिक तसेच डी.आर.बी. माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, सत्रासेन येथे नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करत प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आयोजित या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
प्रवेशोत्सवानिमित्त इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांची पारंपरिक बैलगाडीतून गावातून स्वागत मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या घोषणा देत नागरिकांना शालेय शिक्षणाबाबत जनजागृती केली. प्रत्येक विद्यार्थी नियमित शाळेत उपस्थित राहून गुणवत्तापूर्ण शिक्षण घेईल, हा संदेश या मिरवणुकीतून देण्यात आला.
कार्यक्रमाला आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावलचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी संदीप पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत उज्ज्वल भविष्यासाठी परिश्रम, शिस्त आणि सातत्याचे महत्त्व विशद केले.
संस्थेचे अध्यक्ष रवींद्र रायसिंग भादले व सचिव ज्ञानेश्वर रायसिंग भादले यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक मुख्याध्यापक डी. पी. पावरा आणि माध्यमिक मुख्याध्यापिका वंदना सरदार पावरा यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी नवागत विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, बूट, दप्तर, पाठ्यपुस्तके, वह्या तसेच गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. आनंदी वातावरणात झालेल्या या प्रवेशोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल नवचैतन्य आणि आत्मविश्वास निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.



