जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाने २२ जून रोजी एक विशेष मोहीम राबवली. या धडक कारवाईत पोलिसांनी नियम तोडणाऱ्या शेकडो लोकांवर गुन्हे दाखल करत तब्बल ५ लाख १६ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत ढिवरे यांनी दिली आहे.
सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांची धरपकड :
सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या तळीरामांवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते. या कारवाई दरम्यान मोकळ्या मैदानावर दारू पिणाऱ्या ४१ जणांवर, वाईन शॉपसमोर दारू पिणाऱ्या ५ जणांवर, तर खाद्य स्टॉलसमोर दारू पिणाऱ्या २ जणांवर थेट कारवाई करण्यात आली. तसेच दारू पिऊन बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्या २२ चालकांवर (ड्रंक अँड ड्राईव्ह) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शाळा-कॉलेज परिसर आणि हॉटेल्सवर छापे :
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न विचारात घेता, शाळा आणि कॉलेज परिसरामध्ये जोरात गाड्या चालवणाऱ्या आणि कर्कश हॉर्न वाजवून दहशत निर्माण करणाऱ्या १६ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील पानटपऱ्यांवर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात (कोटपा कायद्यांतर्गत) ७१ केसेस करण्यात आल्या. शहरातील संशयास्पद हालचालींना प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसांनी १५३ हॉटेल्स, ढाबे आणि ‘ओयो’ हॉटेल्ससह १९ कॅफेंची कसून तपासणी केली.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठी कारवाई :
या मोहिमेत मुंबई पोलीस कायद्याच्या कलम ११०/११२ अंतर्गत ४४ जणांवर कारवाई झाली. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ७ वाहनांवर एम.व्ही. ऍक्ट ६६/१९२ नुसार गुन्हा नोंदवला गेला. संपूर्ण कारवाईत मोटर वाहन कायद्यांतर्गत (MVA) एकूण ६८१ केसेस करण्यात आल्या असून, वाहनचालकांकडून ५ लाख१६ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस प्रशासनाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे गुन्हेगारांचे आणि हुल्लडबाजांचे धाबे दणाणले असून, नागरिकांनी पोलिसांच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. आगामी काळातही अशीच कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.



