जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील गणेशवाडी परिसरात घरगुती विहिरीतील इलेक्ट्रिक मोटार काढण्याचे काम सुरू असताना झालेल्या अपघातात आजोबा, नातू आणि शेजारील तरुण विहिरीत पडल्याची घटना बुधवारी (२४ जून) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत आजोबा आणि नातू गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर शेजारील तरुण किरकोळ जखमी झाला आहे.
रामलाल हिरामण भावसार (वय ९१), त्यांचा नातू सिद्धेश महेंद्र भावसार (वय २२) आणि शेजारी राहणारा देवेंद्र राजेंद्र खाचणे (वय २२) हे घरातील सुमारे ५० फूट खोल विहिरीत बसविण्यात आलेली इलेक्ट्रिक मोटार बाहेर काढत होते. यावेळी विहिरीवरील सिमेंटची धाप अचानक वजन सहन न झाल्याने तुटली आणि तिघेही थेट विहिरीत कोसळले.
घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून तिघांनाही सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर जखमींना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रामलाल भावसार आणि सिद्धेश भावसार यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले असून देवेंद्र खाचणे याला किरकोळ दुखापत झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच महापौर दीपमाला काळे यांनी घटनास्थळी भेट देत बचावकार्याचा आढावा घेतला. तसेच शहरातील बंदिस्त आणि धोकादायक विहिरींची तातडीने तपासणी करून संबंधितांना नोटिसा बजावण्याचे आदेश प्रशासनाला दिले. या घटनेमुळे गणेशवाडी परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.



