रावेर प्रतिनिधी । पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रावेर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. पहिल्याच दमदार पावसाने रावेर नगरपालिकेच्या पावसाळापूर्व तयारीच्या दाव्यांची पोलखोल केली असून, ३० लाख रुपये मंजूर करून सुरू असलेल्या नाले व पावसाळी व्यवस्थापनाच्या कामांचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे.
तालुक्यातील भोकर, नागोई, नागझिरी आणि मात्रण नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. नागझिरी नदीला आलेल्या पुरामुळे रस्त्यावर पाणी साचून काही काळ वाहतूक बंद ठेवावी लागली. त्यातच अंकलेश्वर–बुऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गालगत एक भलेमोठे झाड कोसळल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले. दुपारपासून शहराचा वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला.
शहरातील रस्ते, गल्लीबोळ आणि सखल वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. शिवाजी चौकाच्या मागील भागातून पूर गावत शिरल्याने अनेक परिसर जलमय झाले. गटारींची योग्य साफसफाई न झाल्याने त्या तुंबल्या आणि पाणी थेट लोकांच्या घरांमध्ये घुसले. यामुळे घरगुती साहित्य, जनावरांचा चारा आणि जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. परिस्थिती इतकी गंभीर होती की, थेट रावेर पोलीस स्टेशनच्या आवारातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते.
दरवर्षी कोट्यवधींच्या विकासकामांचा गाजावाजा केला जातो, मात्र पहिल्याच पावसात शहर जलमय झाल्याने नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेच्या बेजबाबदारपणामुळे रावेरकरांना या मोठ्या संकटाचा सामना करावा लागत असल्याची भावना सर्वसामान्यांमधून उमटत आहे.



