चाळीसगाव प्रतिनिधी । शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चाळीसगाव शहर पोलिसांनी २४ जून २०२६ रोजी मध्यरात्री २.०० ते पहाटे ४.०० वाजेच्या दरम्यान एक अत्यंत महत्त्वाची आणि धडक ‘कोंबिंग ऑपरेशन’ मोहीम राबवली. या कारवाई दरम्यान पोलिसांनी तब्बल ८० रेकॉर्डवरील आरोपींची कसून तपासणी केली. त्यापैकी ४४ आरोपी हे त्यांच्या घरी मिळून आल्याने त्यांना तात्काळ पोलीस ठाण्यात आणून कडक समज देण्यात आली आहे.
या मोहिमेत पोलिसांना सर्वात मोठे यश नवनाथ नगर (धुळे रोड) भागात आले. येथील एका भाड्याच्या घरातून आरती किरण देढे आणि महेंद्र रंगनाथ हतांगळे हे दोघे विक्रीच्या उद्देशाने १८ तलवारी आणि १० कोयत्यांसारखी धारदार शस्त्रे बाळगताना रंगेहात पकडले गेले. त्यांच्याविरोधात शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय नागद रोड झोपडपट्टी भागातून फरीद खान शाबीर खान यालाही बेकायदेशीरपणे तलवार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
या धडक कारवाई दरम्यान वाहनांची तपासणी करताना पोलिसांनी ३९ लाख रुपये किमतीच्या ३ आलिशान चारचाकी गाड्या संशयास्पद स्थितीत जप्त केल्या आहेत. याप्रकरणी गौरव जाधव, अनिकेत गवळी आणि चेतन गवळी यांच्यावर मुंबई पोलीस कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच अवैध दारूविक्री विरोधात ३ केसेस नोंदवून ६० लिटर गावठी दारू आणि १ हजार लिटर कच्चे रसायन जागीच नष्ट करण्यात आले. पोलिसांना या मोहिमेत न्यायालयाने बजावलेले ८ पकड वॉरंट आणि ३ समन्स बजावण्यातही यश आले आहे. सदर मोठी कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये १ पोलीस निरीक्षक, १ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ५ पोलीस उपनिरीक्षक, ६० पोलीस अंमलदार, स्थानिक गुन्हे शाखा आणि ३ आर.सी.पी. प्लाटुनच्या पथकांनी सहभाग घेतला होता. पोलिसांच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.



