जळगाव प्रतिनिधी | आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ निमित्त महाराष्ट्र योग शिक्षक संघ, जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला योग महाउत्सव रविवारी २१ जून उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. योगप्रेमी, विद्यार्थी, पालक आणि विविध वयोगटातील स्पर्धकांच्या मोठ्या सहभागामुळे हा महाउत्सव यशस्वी ठरला.
महाउत्सवानिमित्त योग नृत्य, योग चित्रकला, योगासन, योगसूत्रपठण आणि योग गीत अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांनी आपल्या उत्कृष्ट कलागुणांसह योगकौशल्याचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण योग सप्ताहात जळगावसह जिल्ह्यातील विविध भागांतून सुमारे ३०० ते ३५० स्पर्धक आणि योगसाधकांनी सहभाग नोंदविला.
स्पर्धांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे, स्मृतिचिन्हे तसेच सुमारे ४५ हजार रुपयांची रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. कृणाल महाजन होते. उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख योग शिक्षक सुनील गुरव, जिल्हाध्यक्षा चित्रा महाजन, उपाध्यक्षा अर्चना गुरव, कोषाध्यक्षा नूतन जोशी तसेच ज्येष्ठ योगगुरू सुभाष जाखेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांनी योग हा केवळ व्यायाम नसून निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवन जगण्याचा प्रभावी मार्ग असल्याचे सांगत सर्वांनी नियमित योग, प्राणायाम आणि ध्यान करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. स्वाती निकम यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. कृणाल महाजन यांनी तर आभार प्रदर्शन चित्रा महाजन यांनी केले.
योग, संस्कार, कला आणि भारतीय परंपरेचा सुंदर संगम घडविणाऱ्या या महाउत्सवाचे सहभागी, पालक आणि नागरिकांनी कौतुक केले. “करो योग, रहो निरोग” हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली. जळगाव जिल्ह्यात योग प्रसारासाठी हा महाउत्सव प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



