मुक्ताईनगर प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुक्यात आज झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अंतुर्ली, कर्कीसह तालुक्याच्या अनेक भागांत ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. पहिल्याच दमदार पावसाने तालुक्याची दाणादाण उडवली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या मुसळधार पावसामुळे कर्की येथे एक थरारक घटना घडली. येथे एका साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी आलेली खाजगी बस नाल्याला अचानक आलेल्या पुरात अडकली. नाल्यावरून पाण्याचा मोठा प्रवाह वाहत असताना चालकाने प्रसंगावधान राखले आणि योग्य वेळी बस थांबवली. चालकाच्या या तत्परतेमुळे बसमधील प्रवाशांचे प्राण वाचले आणि एक मोठा अनर्थ टळला. या सुरक्षित सुटकेनंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.
दरम्यान, या पावसामुळे अनेक सखल भागांतील घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. घरांमध्ये पाणी घुसल्याने नागरिकांच्या संसारोपयोगी वस्तूंचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच, काही व्यापाऱ्यांच्या दुकानांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पहिल्याच पावसाने झालेल्या या नुकसानामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. प्रशासनाने तातडीने या भागाची पाहणी करून पंचनामे करावेत आणि पीडित नागरिकांना योग्य ती नुकसानभरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी आता स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.



