नशिराबाद प्रतिनिधी | पत्रकारांना कथितरित्या अश्लाघ्य शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणाचा निषेध करत नशिराबाद पत्रकार संघाने शुक्रवारी नशिराबाद पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांना निवेदन सादर केले. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून खासदार संजय दिना पाटील यांच्याविरुद्ध कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा व योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार संघाने केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून समाजातील घडामोडी वस्तुनिष्ठपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. अशा परिस्थितीत पत्रकारांशी अपमानास्पद भाषा वापरणे, शिवीगाळ करणे किंवा जीवे मारण्याच्या धमक्या देणे हे प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आघात करणारे असल्याचे संघाने म्हटले आहे.
लोकप्रतिनिधींनी संविधानिक मूल्यांचा सन्मान राखत जबाबदारीने वागणे अपेक्षित असताना अशा प्रकारच्या घटना दुर्दैवी असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. पत्रकारांचा आवाज दडपण्याचा कोणताही प्रयत्न लोकशाही व्यवस्थेस घातक असून, अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालण्यासाठी कठोर कारवाईची आवश्यकता असल्याचे पत्रकार संघाने अधोरेखित केले.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी निवेदन स्वीकारून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवून नियमानुसार आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले. या प्रसंगी सुनील भावसार, प्रा. विश्वनाथ महाजन, चंदन पाटील, हरीश पाटील, सुनील महाजन, सागर मोरे यांच्यासह नशिराबाद पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.



