जळगाव प्रतिनिधी : येथील गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालयाने शैक्षणिक क्षेत्रात एक मानाचा तुरा रोवला आहे. महाविद्यालयाच्या पहिल्याच बॅचच्या प्रथम वर्षाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, विद्यार्थ्यांनी तब्बल ९९ टक्के निकालाची नोंद करत उत्तुंग भरारी घेतली आहे. पहिल्याच वर्षी आयुर्वेद महाविद्यालयाचा निकाल एवढा उत्कृष्ट लागल्याने संपूर्ण खान्देशसह विदर्भातही महाविद्यालयाचा नावलौकीक वाढला आहे.
गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाच्या २०२४-२५ या पहिल्याच बॅचमधील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये अत्यंत चमकदार कामगिरी केली. यामध्ये मनुजा टोपे हिने ७७ टक्के गुण मिळवून महाविद्यालयातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. पहिल्याच वर्षी मिळालेल्या या अभूतपूर्व यशामुळे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी विशेष कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
”पहिल्याच बॅचच्या विद्यार्थ्यांनी घेतलेली ही झेप कौतुकास्पद असून, यामुळे महाविद्यालयाच्या दर्जेदार शिक्षणावर शिक्कामोर्तब झाले आहे.”
— माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, अध्यक्ष, गोदावरी फाउंडेशन.
या घवघवीत यशामागे महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले, रजीस्ट्रार चेतन चौधरी, अॅनाटॉमी विभागप्रमुख डॉ. उमाकांत चौधरी, संहिता विभागप्रमुख डॉ. सुगौतकुमार तायडे आणि क्रीया शरीरविभागप्रमुख डॉ. रूपाली चौधरी यांचे मोलाचे योगदान लाभले. तसेच डॉ. मुकेश चौधरी, डॉ. मयूरी चौधरी, डॉ. अंजना शिंदे आणि प्रा. अमिता निकम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पहिल्याच वर्षाचा निकाल इतका उत्कृष्ट लागल्याने महाविद्यालयाची मान उंचावली असून, जळगाव परिसरासह वैद्यकीय क्षेत्रातून विद्यार्थ्यांवर आणि प्राध्यापकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



