रावेर प्रतिनिधी | तालुक्यातील रायपूर येथील जिल्हा परिषद शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून शाळेकडे जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात चिखल आणि खराब रस्त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनाही मोठी गैरसोय होत होती. या समस्येमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला होता.
ही बाब गावाचे माजी सरपंच रुपेश पाटील यांच्या निदर्शनास पालकांनी आणून दिली. विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांनी तातडीने आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधत परिस्थितीची माहिती दिली. याची गंभीर दखल घेत आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोणताही विलंब न करता स्वखर्चातून मुरूम टाकून शाळेकडे जाणारा रस्ता तयार करून दिला.
रस्ता तयार झाल्यामुळे विद्यार्थ्यांना आता सुरक्षित आणि सुलभ पद्धतीने शाळेत ये-जा करता येत असून पालकांनीही समाधान व्यक्त केले आहे. विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत तातडीने निर्णय घेतल्याबद्दल पालकांनी आमदार चंद्रकांत पाटील तसेच माजी सरपंच रुपेश पाटील यांचे आभार मानले.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधांसाठी अशाच प्रकारची विकासकामे सातत्याने व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या या कामाचे परिसरात कौतुक होत आहे.



