चोपडा प्रतिनिधी | तालुक्यातील अडावद ग्रामपंचायतीतील विकासकामांमध्ये कथित अनियमितता, नातलगांना कंत्राटे देणे आणि शासकीय निधीचा गैरवापर झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. ग्रामपंचायत सदस्य जुनैदखान मुनसाफखान पठाण यांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि काही सदस्य यांनी संगनमताने शासकीय नियमांचे उल्लंघन करत विकासकामांची कंत्राटे स्वतःच्या नातेवाईकांना दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रामपंचायत सदस्य बनोबी रशीद मन्यार यांनी आपल्या नातू शेख नदीम शेख कासिम यांच्या नावावर ग्रामपंचायतीची कामे मंजूर करून घेतल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
या कामाच्या मोबदल्यापोटी १६ एप्रिल रोजी १५ हजार रुपयांचा धनादेश अदा करण्यात आल्याचा उल्लेख तक्रारीत असून, हा व्यवहार नियमबाह्य असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच संबंधित कामाचा ठराव, कंत्राट मंजुरीची प्रक्रिया, बिले, पेमेंटचा तपशील आणि इतर शासकीय कागदपत्रांची तपासणी करून आर्थिक व तांत्रिक चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, काही विकासकामे प्रत्यक्षात न करता किंवा निकृष्ट दर्जाची करून त्यांची बिले काढल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच संबंधित ग्रामपंचायत सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. या गंभीर आरोपांवर प्रशासन कोणती भूमिका घेते आणि चौकशीत काय निष्पन्न होते, याकडे अडावद ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.



