फैजपूर प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७५ वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जून रोजी रात्रीच्या सुमारास आरोपी हा वृद्ध महिलेच्या घरी आला. पिण्यासाठी पाणी मागण्याच्या बहाण्याने त्याने घरात प्रवेश केला. त्यानंतर महिलेवर जबरदस्ती करत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. घटनेनंतर पीडित महिलेने फैजपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि आरोपीला अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू केली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



