अमळनेर प्रतिनिधी | पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर शहरात आज पोलिसांनी विशेष कॉम्बिंग ऑपरेशन राबवत मोठी कारवाई केली. अचानक करण्यात आलेल्या या धडक मोहिमेमुळे शहरातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे दिसून आले.
या विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांनी एकूण ११० आरोपींची पडताळणी केली. त्यापैकी ७० आरोपी आढळून आले, तर १२ फरार आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तसेच ७ नॉन-बेलेबल वॉरंट आणि ९ बेलेबल वॉरंट प्रकरणांमध्येही कारवाई करण्यात आली.
अवैध दारूविरोधातील मोहिमेत ८ ठिकाणी हातभट्टीवर धाडी टाकून सुमारे २,६५० लिटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. याशिवाय दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे सुमारे १२ हजार लिटर रसायन नष्ट करण्यात आले. गुटखा विक्रीविरोधात दोन गुन्हे दाखल करून सुमारे २५ हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.
याच मोहिमेत शस्त्रास्त्र कायदा अंतर्गत एक गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीकडून पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.
अमळनेर शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी पुढील काळातही अशाच प्रकारच्या धडक मोहिमा सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. या व्यापक कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सर्वसामान्य नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले आहे.



