जामनेर प्रतिनिधी | रस्त्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची घटना जामनेर तालुक्यातील वाकोद येथे घडली. या प्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन साहेबराव जोशी (वय ३०, रा. वाकोद, ता. जामनेर) यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. १ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ते त्यांच्या घरासमोर उभे असताना संशयित आरोपी कैलास आत्माराम जोशी व विलास आत्माराम जोशी यांनी मोटारसायकल घेऊन जाताना रस्त्याच्या कारणावरून वाद घातला. यावेळी आरोपींनी शिवीगाळ करून धमकावल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
काही वेळाने दोन्ही आरोपी पुन्हा घटनास्थळी आले. त्यापैकी एकाने लोखंडी कुऱ्हाड, तर दुसऱ्याने लोखंडी रॉड हातात घेऊन फिर्यादीवर हल्ला चढविला. या हल्ल्यातून बचाव करण्याचा प्रयत्न करत असताना गजानन जोशी यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. फिर्यादीचे काका अशोक जोशी हे मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले असता त्यांनाही लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
जखमींवर उपचार करण्यात आले असून, वैद्यकीय अहवाल आणि फिर्यादीच्या जबाबाच्या आधारे पहूर पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे वाकोद परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणाचा पुढील तपास पहूर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी गणेश सुस्ते हे करीत आहे.



