जळगाव प्रतिनिधी | शहरातील मेहरूण परिसरातील सर्व्हे क्रमांक ३४३ येथे सुमारे २५० कोटी रुपये खर्चातून उभारण्यात येत असलेल्या विभागीय क्रीडा संकुलाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे जळगाव शहराच्या क्रीडा क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
विभागीय क्रीडा संकुलाकडे जाणारा सध्याचा रस्ता कच्चा असून तो प्रामुख्याने वहिवाटीसाठी वापरला जातो. भविष्यात या भव्य क्रीडा संकुलात खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडाप्रेमी तसेच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होणार असल्याने संकुलाला जोडणारा प्रशस्त आणि सुसज्ज रस्ता असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी संबंधित जागेची संयुक्त पाहणी करण्यात आली.
या पाहणीवेळी नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, महापौर दिपमाला काळे, महापालिका आयुक्त आदित्य जीवने, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, प्रांताधिकारी विनय गोसावी, महापालिकेचे शहर अभियंता योगेश बोरोले, नगररचना विभागाचे अमोल पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पाहणीदरम्यान सध्या प्रत्यक्ष वापरात असलेला विद्यमान रस्ताच विभागीय क्रीडा संकुलासाठी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. महापालिका प्रशासन, नगररचना विभाग आणि संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाला प्राधान्य देत तातडीने प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या. त्यामुळे क्रीडा संकुलाच्या रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



