जळगाव प्रतिनिधी | जळगाव तालुक्यातील विदगाव पुलावर एका चारचाकी वाहनाला अचानक आग लागल्याची घटना घडली. पुलावरून जळगाव शहराच्या दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. वाहनातील तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्विफ्ट डिझायर कार विदगाव पुलावरून जळगावच्या दिशेने जात असताना वाहनात अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर काही क्षणांतच कारमधून धूर निघू लागला आणि वाहनाने पेट घेतला. पुलाच्या मध्यभागी कारला आग लागल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. घटनेनंतर पुलावरील वाहतूक विस्कळीत झाली. सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहनचालकांनी आपली वाहने काही अंतरावर थांबवली. त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या आणि मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली.
भर पुलावर घडलेल्या या घटनेमुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, वाहनाला नेमकी आग कशामुळे लागली, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसून तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.



