पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा रेल्वे स्थानक परिसरातून बेपत्ता झालेल्या एका तीन वर्षीय बालकाचा अवघ्या दोन दिवसांत शोध लावण्यात पाचोरा पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि सोशल मीडियाच्या प्रभावी वापरामुळे या चिमुरड्याची त्याच्या आई-वडिलांशी सुखरूप भेट घडवून आणली असून, पाचोरा पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मूळचे मध्यप्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील गोसालपूर येथील रहिवासी असलेले राजवीर फकीर आणि बालवीर फकीर हे दाम्पत्य सध्या पाचोरा रेल्वे स्थानक परिसरात भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करते. दोन दिवसांपूर्वी त्यांचा तीन वर्षांचा मुलगा अचानक बेपत्ता झाला होता. मुलाचा शोध न लागल्याने घाबरलेल्या पालकांनी रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली. रेल्वे पोलिसांनी तातडीने या घटनेची माहिती पाचोरा पोलिसांना दिली.
माहिती मिळताच पाचोरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी हरीश परदेशी यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. त्यांनी रेल्वे स्थानक आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. केवळ एवढ्यावरच न थांबता, त्यांनी सोशल मीडियाचा कौतुकास्पद वापर केला. बालकाचा फोटो व्हॉट्सॲपच्या विविध ग्रुप्सवर आणि स्थानिक पोलीस पाटलांच्या माध्यमातून सर्वत्र प्रसारित करण्यात आला.
सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यामुळे या मोहिमेला मोठे यश आले. जामनेर तालुक्यातील एका महिलेकडे हा बालक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ तेथे पोहोचून चौकशी केली असता, संबंधित महिलेने सांगितले की, हा मुलगा चुकून तिच्यासोबत आला होता आणि तिने दोन दिवस त्याचा सांभाळ केला.
महिला प्रवाशाने बालकाला पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पाचोरा पोलिसांनी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून चिमुरड्याला त्याच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले. दोन दिवसांपासून विखुरलेले कुटुंब पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुन्हा एकत्र आले असून, आपल्या काळजाच्या तुकड्याला सुखरूप पाहून आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. या संवेदनशील कामगिरीबद्दल पोलीस कर्मचारी हरीश परदेशी आणि पाचोरा पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.



