जळगाव प्रतिनिधी | खान्देश इनक्युबेशन, टेक्नॉलॉजी अँड आंत्रप्रेन्योरशिप अर्थात काईट फोरमचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जळगाव जिल्ह्यातील विविध स्टार्टअप फाऊंडर्स आणि को-फाऊंडर्सचा विशेष सत्कार करण्यात आला.
काईट कार्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील होते. प्रमुख वक्ते म्हणून सुगोकी ग्रुपचे संचालक धनराज कासट उपस्थित होते. यावेळी डॉ. शांताराम बडगुजर, डॉ. युवराज परदेशी आणि सीईओ सागर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविकात सागर पाटील यांनी काईट फोरमच्या वर्षभरातील कामाचा आढावा घेतला. गेल्या वर्षभरात तीन स्टार्टअप लाँचपॅड आयोजित करण्यात आले. चार महाविद्यालयांसोबत सामंजस्य करार करण्यात आले असून, जिल्ह्यातील २४ स्टार्टअप फाऊंडर्स आणि को-फाऊंडर्सना थेट मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
धनराज कासट यांनी तरुणांना उद्योग सुरू करताना चांगल्या कल्पनेसोबत प्रामाणिकपणा आणि योग्य संधी ओळखण्याचे कौशल्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील तरुणांमध्ये मोठी क्षमता असून, योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते उद्योग क्षेत्रात मोठी कामगिरी करू शकतात, असे डॉ. के. बी. पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमात निलेश शेटे, आरती शेटे, प्रसाद नेवे, जगदीश माळी, गोपाळ माळी आणि सिद्धेश रणधीर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शिक्षण, उद्योग आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. युवराज परदेशी यांनी केले.



