चाळीसगाव प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, सुगंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरोधात चाळीसगाव शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पाच संशयितांना अटक करण्यात आली असून, कारसह एकूण ६ लाख ५७ हजार ७०७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या सूचनेनुसार अवैध धंद्यांविरोधात कारवाई सुरू असताना चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमितकुमार मनेळ यांना गुटखा वाहतुकीची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली. या प्रकरणी अजित चांदमल रावलानी, कुबेर शेख कसम, हितेश किशोर पवार, निखिल राजेंद्र कंसवाणी आणि सोहम संजय शिंगणे या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले.
संशयितांच्या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, सुगंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखू आढळून आला. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून पंचनामा करण्यात आला. त्यानंतर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
प्राथमिक तपासात हा प्रतिबंधित माल मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथून तस्करी करून चाळीसगावात आणल्याचे समोर आले आहे. या तस्करीच्या साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत. नागरिकांनी अवैध गुटखा विक्री किंवा वाहतुकीची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.



