जळगाव प्रतिनिधी | तरुणांमध्ये वाढत असलेल्या दारू, तंबाखू, गुटखा, सिगारेट तसेच इतर अमली पदार्थांच्या व्यसनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी, जळगाव यांच्या वतीने नूतन मराठा महाविद्यालयात व्यसनमुक्ती जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले. गुरुवार 9 जुलै रोजी सकाळी 10 वाजता महाविद्यालयाच्या बोस सभागृहात हा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हुमेद महाडिक यांनी एनसीसी कॅडेट्सना मार्गदर्शन केले. यावेळी 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल धीरज मिनोत्रा, एओ कर्नल अश्विन वैद्य, सुभेदार मेजर बाबू, विनय शर्मा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
डॉ. हुमेद महाडिक यांनी व्यसनाधीनतेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम स्पष्ट केले. व्यसनापासून दूर राहून निरोगी आणि शिस्तबद्ध जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. प्राचार्य डॉ. देशमुख यांनी गुटखा, सिगारेट आणि मद्यपानासारख्या व्यसनांचे दुष्परिणाम सांगत युवकांनी अशा सवयींपासून दूर राहावे, असे आवाहन केले.
विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी 20 प्रश्नांची प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवम पाटील व करण पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय पियुष पाटील यांनी करून दिला, तर जय कोळी यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला लेफ्टनंट प्रा. शिवराज पाटील, लेफ्टनंट प्रा. हेमाक्षी वानखेडे, डॉ. समाधान पाटील, राजधार पाटील, घनश्याम पाटील यांच्यासह एनसीसी कॅडेट्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.



