चाळीसगाव प्रतिनिधी | चाळीसगाव शहर पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा तस्करीविरोधात मोठी कारवाई करत मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथून सुरू असलेले रॅकेट उघडकीस आणले आहे. शहरातील विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये गुटखा, सुगंधित पानमसाला, सुगंधित तंबाखू तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार असा एकूण ६ लाख ५७ हजार ७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईदरम्यान अजित रावलानी, कुबेर कदम, हितेश पवार, निखिल केसवानी आणि सौरभ शिंगणे या पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या मालामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा समावेश असून हा माल विक्रीसाठी चाळीसगावात आणला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
पोलीस चौकशीत हा प्रतिबंधित माल मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथून चाळीसगावात तस्करीमार्फत आणला जात असल्याची माहिती उघड झाली आहे. या रॅकेटमध्ये आणखी काही व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
या धडक कारवाईमुळे शहरात सुरू असलेल्या प्रतिबंधित गुटखा तस्करीला मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अवैध तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री व वाहतुकीविरोधात अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.



